जेथे जातो तेथे, मी माझा सांगाती,
पुढे आणि पाठी मीच माझ्या !
मीच माझी वाट, मीच माझा दिवा
हिऱ्याचा ताजवा मीच माझ्या .
मीच माझी रूपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यांत मीच त्यांना .
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला.
अशी माझी चाले नित्य मम-पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो.
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे !
~ बा.भ. बोरकर.
Негізгі бет बा.भ.बोरकर जयंती_ कविता २
Пікірлер